पुसद : येथील उपजिल्हा रुग्णालय समस्यांचे माहेरघर 


पुसद : येथील उपजिल्हा रुग्णालय समस्यांचे माहेरघर



पुसद : येथील उपजिल्हा रुग्णालय समस्यांचे माहेरघर बनले आहे. मान्यता १०० बेडची असताना, प्रत्यक्षात ५० बेड आहे. स्त्री रुग्णालयासाठी मागणी होत असताना, शासन दरबारी खर्च करून मंजुरात मिळविण्याचे लोकप्रतिनिधींकडून प्रयत्न होत नाही.


येथे एकेका खासगी दवाखान्यात दररोज हजारोंची उलाढाल होते, परंतु गरीब रुग्णांना उपजिल्हा रुग्णालयाशिवाय पर्याय नाही. दिवंगत सुधाकरराव नाईक यांनी उपजिल्हा रुग्णालयात १०० बेडची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, येथील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना तेच नको होते. खासगी व्यावसायिकांचा येथे दबदबा होता व आजही आहे.


उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी मोठ्या प्रमाणावर महिला येतात. दररोज १२ ते १३ प्रसूती होतात. त्यामुळे नवीन स्त्री रुग्णालयाची नितांत आवश्यकता आहे. सध्या कर्मचारी कमी आहे. अपुर्‍या मनुष्यबळावर उपजिल्हा रुग्णालय चालणार कसे, असा प्रश्न आहे. नवीन स्त्री रुग्णालय व्हावे, यासाठी कुणीच गांभीर्याने शासनाकडे पाठपुरावा करण्यास तयार नाही.


उपजिल्हा रुग्णालयात सिटी स्कॅन मशीनची नितांत गरज आहे. गरीब रुग्णांना खासगी दवाखान्यात सिटी स्कॅन करून घेणे शक्य नाही. एक्स-रे फोटोग्राफी मशीन आहे, पण ती धूळखात आहे. त्याचा उपयोग केल्यास खासगी रुग्णालयातील सोनोग्राफी सेंटर चालणार नाही, म्हणून मशीन तशीच ठेवलेली दिसते. इमारतीचे फाउंडेशन कच्चे आहे. बेसिक फाउंडेशन भविष्याचा विचार न करता तयार केले. त्यावर मजले बांधले जाऊ शकत नाही, असे जाणकारांचे मत आहे.


येथील ओपीडी सेंटर केवळ दोन ते तीन डॉक्टरांच्या भरवशावर सुरू आहे. तज्ज्ञ डॉक्टर्सची कमतरता आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, औषधीसाठा शून्य आहे. औषधी नाही, तर रुग्णांवर उपचार कसे करणार, असा प्रश्न आहे

Credit by.. Lokamat news