पालघर जिल्ह्यापर्यंत त्याची लिंक लागली. पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळत आरोपींना अटक केली आहे. रेमडेसिविरच्या नावावर दुसरेच इंजेक्शन हे भामटे विकत असल्याचं समोर आलं.
मुंबई, 22 एप्रिल : कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिविरचा काळाबाजार करण्याबरोबरच आता भामट्यांनी नकली औषधं विकायला सुरुवात केली आहे. (Duplicate Remdesivir racket) अशाच एका टोळीचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. पालघर जिल्ह्यापर्यंत त्याची लिंक लागली. पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळत आरोपींना अटक केली आहे. रेमडेसिविरच्या नावावर दुसरेच इंजेक्शन हे भामटे विकत असल्याचं समोर आलं आहे.
मुंबईत कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. या रुग्णांपैकी अनेकांना बेड्स मिळत नाही, तर अनेकांना व्हेंटिलेटर ऑक्सिजन मिळत नाही. उपचारात वापरल्या जाणाऱ्या रेमडेसिविरचाही प्रचंड तुटवडा आहे. याचाच फायदा घेत भामटे लोकांना फसवत आहेत. चेंबूरच्या टिळकनगर मध्ये असाच एक प्रकार समोर आला. या ठिकाणावरील रहिवासी मेघना ठक्कर यांना 15 एप्रिलला व्हाट्सअॅपवर रेमेडेसिविर इंजेक्शन 900 ते 4000 च्या दरात मिळेल असा मॅसेज आला होता. त्यानंतर नातेवाईकाला गरज असल्याने मेघना याचे पती नितेश ठक्कर यांनी 18 एप्रिलला संबंधित नंबरवर मॅसेज केला. घाटकोपरच्या हिंदू सभा रूग्णालयात उपचार घेत असलेल्या नातेवाईकांना इंजेक्शन हवं असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यावर त्यांना मिळालेला क्रमांक त्यांनी त्यांचे नातेवाईक चेतनभाई मेस्त्री यांना दिला.
चेतनभाई यांचे नातेवाईक अनिलभाई मेस्त्री हिंदुसभा रुग्णालयात कोविडवर उपचार घेत होते. त्यामुळं चेतन यांनी त्यांच्यासाठी संबंधित नंबरवर रेमडेसिविरसाठी संपर्क साधला. त्यावर समोरून बोलत असलेल्या रुपेश गुप्तांनं केवळ सहा इंजेक्शन शिल्लक असून प्रत्येकी 3 हजारांना मिळेल असे सांगितले. त्यानं पैसे गुगल पेद्वारे मागवले. पैसे दिल्यानंतर 2 ते 3 तासांत कुरिअर बॉय मार्फत इंजेक्शनची डिलीव्हरी मिळेल असं त्यानं सांगितलं. सोबत त्यानं डॉक्टरची चिठ्ठीही व्हाट्सअॅप करायला सांगितले. त्यामुळं मेस्त्री यांना खरं वाटल्यानं त्यांनी पैसे पाठवले. त्यानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास एका कुरिअर बॉय मार्फत पॅकिंग केलेले इंजेक्शन घरी पोहोचले. थर्माकोलचा बॉक्स उघडून पाहिले असता त्यात बर्फाच्या दोन पिशव्यांमधे सहा इंजेक्शनच्या बॉटल होत्या. पण त्यावर रेमडेसिविरचे स्टिकर किंवा नावही नव्हते. त्यामुळं त्यांना संशय आला. त्यांनी पुन्हा संबंधित नंबरवर फोन लावला तर तो बंद आला. आपली फसवणूक झाली असं लक्षात आल्यानंतर त्यांनी टिळकनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
पोलिसांनी 4 अधिकारी आणि 3 कर्मचाऱ्यांचं पथक तयार केलं. ज्या नंबरवर पैसे पाठवले त्याचं लोकेशन तपासलं असता ते पालघर जिल्ह्यातल्या वाळीवमध्ये निघालं. तपास पथक लगेच तिकडे रवाना झालं. संबंधित लोकेशनवर पोहोचल्यानंतर महालक्ष्मी मेडिकलमध्ये करणारा गुप्ताचा मित्र श्रावण राजपूत याच्या सांगण्यावरून त्यानं ट्रकसोल - एस 1 हे अँटी बायोटिक्स रेमडेसिविर नावाने विकल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांनी रुपेशला अटक केली. आणखी दोन ते तीन जण त्याच्याबरोबर होते. त्यांचा तपास पोलीस करत आहेत. विविध ठिकाणी 7 जणांना असे एकूण 29 इंजेक्शन विकल्याची कबुली त्यांनं दिली.
Credit by news18 lokamat
0 Comments