लॉकडाऊनमध्ये (Corona lockdown) गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी आतुर झालेल्या या बॉयफ्रेंडला मुंबई पोलिसांनी (Mumbai police) असं उत्तर दिलं, त्यावरून त्यांचं कौतुक केलं जातं आहे.
मुंबई, 22 एप्रिल : सध्या राज्यात कोरोनाचा (Coronavirus) विळखा घट्ट झाला आहे. पुन्हा लॉकडाऊनसारखे (Corona lockdown) कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. फक्त अत्यावश्यक सेवाच सुरू ठेवण्यात आल्या आहेत. अगदी वाहनांचीही गर्दी नको म्हणून मुंबईत गाड्यांसाठी कलर स्टिकर (colour stickers to vehicles) बंधनकारक करण्यात आले आहेत. प्रत्येक जण आपण हे काम करतो किंवा ही सेवा देतो तर आपण आपल्या वाहनांना कोणत्या रंगाचा स्टिकर लावावा याबाबत मुंबई पोलिसांना (Mumbai police) ट्वीट करत आहे. एका पठ्ठ्याने तर चक्क 'मला गर्लफ्रेंडला भेटायचं आहे, मग मी कोणतं स्टिकर लावू', असा प्रश्न विचारला. मुंबई पोलिसांनीसुद्धा त्याला मजेशीर उत्तर दिलं आहे.
अश्विन विनोद नावाच्या ट्विटर युझरने मुंबई पोलिसांना टॅग करून एक ट्वीट केलं. 'मला माझ्या गर्लफ्रेंडला भेटायचं आहे. मला तिची खूप आठवण येत आहे. तिला जर मला भेटायला जायचं असेल तर मी माझ्या गाडीवर कोणतं स्टिकर वापरू?' असा प्रश्न त्याने पोलिसांना विचारला.
खरंतर हा प्रश्न तसा प्रत्येक तरुणाच्या मनातीलच आहे. पण तरीसुद्धा मुंबई पोलिसांना ट्वीट करत असा प्रश्न विचारणं म्हणजे तुम्हाला मजेशीर किंवा टाइमपास वाटेल. पण मुंबई पोलिसांनी मात्र असं समजून त्याकडे दुर्लक्ष केलं नाही. तर त्या प्रेमीच्या भावना समजून घेतल्या. त्याच्या या प्रश्नाला गांभीर्याने घेतलं आणि त्याला तसंच उत्तरही दिलं.
मुंबई पोलिसांनी आपल्या खास शैलीत या प्रेमीला उत्तर दिलं. मुंबई पोलिसांनी ट्वीट केलं, "आम्हाला माहिती आहे की, ही आपल्यासाठी अत्यावश्यक गोष्ट आहे. पण दुर्दैवाने ही गोष्ट आमच्या अत्यावश्यक किंवा आपत्कालीन श्रेणीमध्ये येत नाही. दुराव्याने प्रेम अधिक वाढतं आणि सध्या आपण स्वस्थ आहात. आपण दोघं आयुष्यभर एकत्र राहावं यासाठी आम्ही आपल्याला शुभेच्छा देत आहोत. हा फक्त एक टप्पा आहे"
पोलिसांच्या या उत्तरावर अनेक नेटिझन्सच्या प्रतिक्रिया आल्या. पोलिसांनी त्या तरुणाचा आदर राखत, त्याच्या भावनाही दुखावणार नाहीत आणि नियमही मोडणार नाही, शिवाय त्या तरुणालाही पटेल अशा पद्धतीने उत्तर दिलं. त्यामुळे मुंबई पोलिसांचं कौतुक होतं आहे.
0 Comments