दरम्यान कोरोनाच्या संकटकाळात झालेल्या या विवाह सोहळ्याला किती पाहुणे होते याचीही माहिती घेतली जात आहे.

लग्नानंतर समजले नवरदेव आणि 2 वऱ्हाडी पॉझिटिव्ह, संपूर्ण गावात भीतीचं वातावरण


कोल्हापूर, 20 एप्रिल : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात एका विवाह सोहळ्यानंतर नवरदेव आणि त्याचे दोन नातेवाईकच कोरोनाबाधित (Corona Positive) असल्याचं समोर आल्यानं खळबळ माजली आहे. लग्नानंतर उपस्थितांपैकी काही जणांना कोरोनासदृश्य लक्षणंही आढळली. त्यामुळे या सोहळ्याला उपस्थित असलेले इतर नातेवाईक आणि पाहुण्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.


कोल्हापूरमध्ये राहत असलेल्या एका व्यावसायिकाच्या दोन मुलांचा विवाह नुकताच राधानगरीमधील गुडाळ या गावामध्ये झाला. मात्र या दोन नवरदेवांपैकी एक नवरदेव आणि त्यांचे नातेवाईक असलेलं एक दाम्पत्य अशा तिघांना कोरोनाची लागण झाल्याचं नंतर स्पष्ट झालं. त्यानंतर लग्नाला आलेल्यांपैकी काही जणांनाही कोरोनाची लक्षणं आढळली. त्यामुळे त्यांची तपासणी केली असता आणखी एक महिला पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं. तसंच गावात आणखी एक तरुणही पॉझिटिव्ह आला आहे. तो पुण्याहून गावी आला होता. त्यामुळे गावात कोरोना रुग्णांची संख्या पाचवर गेली.

या प्रकारानंतर प्रशासनाने तातडीने याची दखल घेतली असून संबंधित नवरदेवाचं घरं आणि उपस्थित नातेवाईक राहत असलेला परिसर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केला आहे. तसंच गावात संशयितांची तपासणी करण्यात येत असून परिस्थितीवर लक्ष दिलं जात आहे.


दरम्यान कोरोनाच्या संकटकाळात झालेल्या या विवाह सोहळ्याला किती पाहुणे होते याचीही माहिती घेतली जात आहे. कोरोनाचे निर्बंध पाळून विवाह झाला किंवा नाही याचाही तपास केला जात आहे. मात्र एकूण परिस्थिती पाहता सर्वांनीच काळजी घेतली नाही, तर अशा सोहळ्यांमधून मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता असते

Credit by news 18 lokamat